
महाराष्ट्राला अनेक मातब्बर नेते लाभले. त्यातील काही जणांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केले. तर काहींनी केवळ घर भरण्याचे काम केले. परंतु ज्यांनी आपल्या कर्तत्वाने महाराष्ट्रातील जनमाणसाच्या मनावर अधिराज्य गाजविले अशा महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये बाळासाहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक खंबीर, मराठी, हिंदुत्ववादी नेते म्हणुन बाळासाहेब संपूर्ण देशाला माहित आहेत. मराठीचा बाणा जपण्यासाठी आणि मुंबईतल्या कष्टकरी, तरुणांसाठी तर बाळासाहेब हे दैवतच आहेत. परंतु गेल्या ४०-५० वर्षांच्या इतिहासात शिवसेनेने महाराष्ट्रात जे काम केले (विशेष म्हणजे त्या कामाची जी पध्दत होती) त्यामुळे शिवसेनेची एक वेगळी प्रतिमा जनमाणसात निर्माण झाली आहे. भडलेल्या डोक्याच्या तरुणांना हाताशी घेउन मुजोर राजकारण करण्यात शिवसेना धन्यता मानते, असा समज सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे आणि काही अंशी तो खरा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ठाकरे परिवारातूनच हे संस्कार घेउन महाराष्ट्राचा नवनिर्माण करायला निघालेले राज ठाकरे याच पावलावर पाउल ठेवून पुढे चालले आहे. वर्षानुवर्ष एकच हिंदुत्वाचा मुदृा रेटत शिवसेनेचा प्रवास सुरु आहे. तर कधी कधी मराठीची तुतारी वाजवून शिवसेना स्वत:ला तारण्याचा प्रयत्न करते. आजच्या पिढीच्या समस्या आणि वेगाने होणाऱ्या विकासप्रक्रियेशी फारकत घेणारे हे विचार माञ आजच्या राजकीय परिस्थितीला फारसे सुसंगत वाटत नाहीत. अणुकरारासारख्या सारख्या महत्वाच्या मुदृयावरुन काँग्रेस सरकारला विश्वादर्शक ठरावाला सामोरे जावे लागत असताना, अशा परिस्थितीत निवडणुक लढविण्यासाठी शिवसेना, भाजप यांसारख्या पक्षांचा हिंदुत्व, आणि राममंदिराचा मुदृा कितपत लागु पडेल, याबाबत शंकाच वाटते. त्यातच आता भाजपचे वरुण गांधी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणीवरुनही बरच वादळ उठलंय. वरुण गांधी यांनी हिंदुंना हात लावणाऱ्यांचा हात तोडण्याची थेट गितेवर हात ठेउनच शपथ घेतली, तर उध्दव यांनी मनमोहन सिंग यांचा भाषणात नामर्द असा उल्लेख केला. यातून या पक्षांना नेमके काय साधायचे आहे, हे जरी स्पष्ट होत नसले, तरी आताच्या बदलत्या राजकारणात अशा भूमिका कितपत उपयोगी पडतील याबदृल शंकाच वाटते. एकीकडे हे नेते इतरांवर वैयक्तीक टिप्पणी करतात. तर दुसरीकडे बाळासाहेबांची नक्कल केली म्हणुन याच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे, हे फारच हास्यास्पद वाटते. बाळासाहेब स्वत: एक ज्येष्ठ कार्टुनिस्ट आहेत. ते स्वत: आपल्या कलेतून कित्येक राजकीय नेत्यांची टिंगल करतात. बाळासाहेबांच्या भाषणात तर अनेकदा असंसदीय शब्दांचा वापर असतो. त्याबदृल त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु बाळासाहेबांची नक्कल केलेली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेले योगदान अमुल्य आहे. त्यांच्या काही भूमिका आणि त्या व्यक्त करण्याचे ठाकरी माध्यम पटण्यासारखे नसले तरीही त्यांचे मराठी माणसाविषयीचे प्रेम आणि मराठीसाठी त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. परंतु आजच्या बदलत्या युगात असे पक्ष आपली भूमिका बदलणारच नाही का, असा प्रश्न पडतो. इतरांना दोष देउन आणि फक्त टिका करुन निवडणुका जिंकता येत नाही. आजचा समाज जिंकायचा असेल तर ठोस विकासात्म ध्येयधोरणांची गरज आहे. या पक्षांकडे ही धोरणे आहेत का? आहेत तर आपल्या भाषणांमधुन ते ती उघउपणे जाहीर का करीत नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीनंतर तरी या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, एवढीच अपेक्षा.............