Thursday, March 26, 2009

आजचं राजकारण, कालचा मुदृा


महाराष्ट्राला अनेक मातब्बर नेते लाभले. त्यातील काही जणांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केले. तर काहींनी केवळ घर भरण्याचे काम केले. परंतु ज्यांनी आपल्या कर्तत्वाने महाराष्ट्रातील जनमाणसाच्या मनावर अधिराज्य गाजविले अशा महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये बाळासाहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक खंबीर, मराठी, हिंदुत्ववादी नेते म्हणुन बाळासाहेब संपूर्ण देशाला माहित आहेत. मराठीचा बाणा जपण्यासाठी आणि मुंबईतल्या कष्टकरी, तरुणांसाठी तर बाळासाहेब हे दैवतच आहेत. परंतु गेल्या ४०-५० वर्षांच्या इतिहासात शिवसेनेने महाराष्ट्रात जे काम केले (विशेष म्हणजे त्या कामाची जी पध्दत होती) त्यामुळे शिवसेनेची एक वेगळी प्रतिमा जनमाणसात निर्माण झाली आहे. भडलेल्या डोक्याच्या तरुणांना हाताशी घेउन मुजोर राजकारण करण्यात शिवसेना धन्यता मानते, असा समज सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे आणि काही अंशी तो खरा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ठाकरे परिवारातूनच हे संस्कार घेउन महाराष्ट्राचा नवनिर्माण करायला निघालेले राज ठाकरे याच पावलावर पाउल ठेवून पुढे चालले आहे. वर्षानुवर्ष एकच हिंदुत्वाचा मुदृा रेटत शिवसेनेचा प्रवास सुरु आहे. तर कधी कधी मराठीची तुतारी वाजवून शिवसेना स्वत:ला तारण्याचा प्रयत्न करते. आजच्या पिढीच्या समस्या आणि वेगाने होणाऱ्या विकासप्रक्रियेशी फारकत घेणारे हे विचार माञ आजच्या राजकीय परिस्थितीला फारसे सुसंगत वाटत नाहीत. अणुकरारासारख्या सारख्या महत्वाच्या मुदृयावरुन काँग्रेस सरकारला विश्वादर्शक ठरावाला सामोरे जावे लागत असताना, अशा परिस्थितीत निवडणुक लढविण्यासाठी शिवसेना, भाजप यांसारख्या पक्षांचा हिंदुत्व, आणि राममंदिराचा मुदृा कितपत लागु पडेल, याबाबत शंकाच वाटते. त्यातच आता भाजपचे वरुण गांधी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणीवरुनही बरच वादळ उठलंय. वरुण गांधी यांनी हिंदुंना हात लावणाऱ्यांचा हात तोडण्याची थेट गितेवर हात ठेउनच शपथ घेतली, तर उध्दव यांनी मनमोहन सिंग यांचा भाषणात नामर्द असा उल्लेख केला. यातून या पक्षांना नेमके काय साधायचे आहे, हे जरी स्पष्ट होत नसले, तरी आताच्या बदलत्या राजकारणात अशा भूमिका कितपत उपयोगी पडतील याबदृल शंकाच वाटते. एकीकडे हे नेते इतरांवर वैयक्तीक टिप्पणी करतात. तर दुसरीकडे बाळासाहेबांची नक्कल केली म्हणुन याच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे, हे फारच हास्यास्पद वाटते. बाळासाहेब स्वत: एक ज्येष्ठ कार्टुनिस्ट आहेत. ते स्वत: आपल्या कलेतून कित्येक राजकीय नेत्यांची टिंगल करतात. बाळासाहेबांच्या भाषणात तर अनेकदा असंसदीय शब्दांचा वापर असतो. त्याबदृल त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु बाळासाहेबांची नक्कल केलेली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेले योगदान अमुल्य आहे. त्यांच्या काही भूमिका आणि त्या व्यक्त करण्याचे ठाकरी माध्यम पटण्यासारखे नसले तरीही त्यांचे मराठी माणसाविषयीचे प्रेम आणि मराठीसाठी त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. परंतु आजच्या बदलत्या युगात असे पक्ष आपली भूमिका बदलणारच नाही का, असा प्रश्न पडतो. इतरांना दोष देउन आणि फक्त टिका करुन निवडणुका जिंकता येत नाही. आजचा समाज जिंकायचा असेल तर ठोस विकासात्म ध्येयधोरणांची गरज आहे. या पक्षांकडे ही धोरणे आहेत का? आहेत तर आपल्या भाषणांमधुन ते ती उघउपणे जाहीर का करीत नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीनंतर तरी या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, एवढीच अपेक्षा.............

Monday, March 23, 2009

तूजवाचून जमेना....

महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळणारी राजकीय समीकरणे या निवडणुकीत जुळून येण्याची शक्यता आता पुरेशी संपुष्टात आली आहे. महिनाभरापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसमध्ये युती होण्याची शक्यता राजकीय जाणकार आणि मीडियाने वर्तविली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दहा वर्षांच्या घरोब्याला ग्रहण लागल्याचे जाणवायला लागले. दोन्ही पक्षातील राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर कुठल्या ना कुठल्या कारणावरुन शेरेबाजी करुन मीडियाच्या या शंकेला खतपाणीच घातले. त्यानंतर गेले काही दिवस आघाडी होणार की नाही, याबाबतही शंका निर्माण व्हायला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या अपेक्षा आणि शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न घेउन आघाडी करणे काँग्रेसला धोक्याचे वाटू लागले. त्यामुळे राज्यातील विलासराव देशमुखांसारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रातील मराठी नेते यांनी पवारांच्या खेळीची काँग्रेस पक्षश्रेष्ठींना जाणीव करुन दिली. निवडणुकपूर्व आघाडी केल्यास आणि न केल्यास किती जागांचा फरक पडेल याचा हिशेब सांगणारा एक अहवालच दिल्लीत सादर करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी गरज पडल्यास आपली सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करण्याचीही तयारी असल्याचे जाहीर केले. परिणामी पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी आपल्या जागा खुपच कमी असल्याचे पवारांना जाहीर मान्य करावे लागले. नव्हे काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याकडून ते वदवूनच घेतले. पवारांचे ओळख एक धुर्त राजकारणी अशीच आहे. त्यामुळे ते कधी काय भूमिका घेतील, याबाबत नेमके भाकित करणे कठीणच आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनाही याची पुरती जाणीव आहे. त्यामुळे जागावाटपाचा घोळ निस्तरण्याआधिच पवार निवडणुकीनंतरही काँग्रेससोबतच राहतील, ते वेगळी चुल मांडणार नाहीत, याची खाञी करणे काँग्रेसला आवश्यक वाटले असावे. काही जणांचा विरोध असला तरीही आघाडी हवीच! असे मत असलेला मोठा मतप्रवार दोन्ही काँग्रेसमध्ये होता. एकंदरीतच राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात चांगला जोर असला आणि काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष असला, तरीही येथे दोघांचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रविवारी अगदी ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर एकमत झाले. सोमवारीच दोन्ही पक्षांनी आपल्या काही उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आणि खऱ्या अर्थाने निवडणुक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकंदरीतच दोन्ही काँग्रेसची अवस्था "तूजवाचून जमेना....." अशी झाली आहे. शिवसेनेनेही आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख यावेळी प्रचाराच्या रिंगणात उतरणार नसले तरीही उध्दव ठाकरे यावेळी जोरदार कामाला लागले आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर सभांचा सपाटा लावला आहे. भारतीय जनता पक्षही भर मंदीत आयटी व्हिजन डोळयासमोर ठेउन मते मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.

माझा जाहीरनामा


महाराष्ट्रातील राजकारणाची "दशा आणि दिशा" या विषयावर नेमका प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा तेवढाच अभ्‍यास हवा! तसा अभ्यास असणारी आणि येथील राजकीय नेत्यांची खरी जातकुळी माहित असलेली जाणकार मंडळीही राज्यात आहे. परंतु निवडणुका आल्या की, का कुणास ठाउक ही मंडळी कोठेतरी गायब होतात. नेमक्या अशावेळीच महाराष्ट्रातील नागरिकांना येथील तरुणांना राजकारण आणि निवडणुकींविषयी अधिक जागरुक करण्याची गरज असते. परंतु कूणीही जाणकार यात पुढे सरसावत नाही. यशवंतराव चव्हाणांपासूनच महाराष्ट्राचा इतिहास अशावेळी तरुण पिढीसमोर उकलून ठेवण्याची गरज आज निर्माण झाल्याचे जाणवते. काही सामाजिक संस्था आणि निवडक माणसे यासाठी प्रयत्नही करताहेत, परंतु तेवढा प्रयत्न पुरेसा नाही. याकरीता व्यापक अभियान उभे करण्याची गरज आहे. आजची बदलती राजकीय परिस्थिती, बदलती समीकरणे आणि सत्तेच्या हव्यासापोटी अधिकाधिक खालच्या थराला जात असलेले राजकारण यामुळे जनमानसाच्या मनात राजकारणाबदृल कटुता निर्माण होत चालली आहे. ज्या लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकडून या लोकशाहीची स्थापना केली, त्या लोकशाहीच्या मनातच स्वत:बदृल अशी भावना निर्माण होणे हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने फारच घातच आहे. त्यामुळेच आज देशाची तरुण पिढीही या क्षेञाकडे हिन नजरेने पहायला लागली आहे. सुशिक्षीत वर्ग तर "हा गाव आपला नाही" अशी भूमिका घेउन मतदानाच्या हक्कापासूनच फारकत घ्यायला लागला आहे. केवळ निवडणुकीच्या निमित्ताने सुटी मिळते, ऐवढाच काय तो फायदा अशी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण होतेय जी भविष्यात फार धोकादायक वळण घेउ शकते. त्यामुळे आज सजग आणि सपन्न अशा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या उभारणीसाठी एक व्यापक मोहिम राबविण्याची गरज आहे. काही स्वार्थी राजकारण्यांची अं:धकाराच्या खाईत लोटलेल्या लोकशाहीलाच या जोखडातून मुक्त करण्याची गरज आहे. चला तर या नवीन लढाईला आज नव्हे तर आतापासूनच सुरुवात करुयात. आपल्याला अश्वासनांची खैरात वाटणाऱ्या या राजकारण्यांना आता आपण आपला जाहिरनाम ऐकवायचा. त्यासाठी या रिंगणात उतरायलाच हवे!