महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळणारी राजकीय समीकरणे या निवडणुकीत जुळून येण्याची शक्यता आता पुरेशी संपुष्टात आली आहे. महिनाभरापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसमध्ये युती होण्याची शक्यता राजकीय जाणकार आणि मीडियाने वर्तविली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दहा वर्षांच्या घरोब्याला ग्रहण लागल्याचे जाणवायला लागले. दोन्ही पक्षातील राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर कुठल्या ना कुठल्या कारणावरुन शेरेबाजी करुन मीडियाच्या या शंकेला खतपाणीच घातले. त्यानंतर गेले काही दिवस आघाडी होणार की नाही, याबाबतही शंका निर्माण व्हायला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या अपेक्षा आणि शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न घेउन आघाडी करणे काँग्रेसला धोक्याचे वाटू लागले. त्यामुळे राज्यातील विलासराव देशमुखांसारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रातील मराठी नेते यांनी पवारांच्या खेळीची काँग्रेस पक्षश्रेष्ठींना जाणीव करुन दिली. निवडणुकपूर्व आघाडी केल्यास आणि न केल्यास किती जागांचा फरक पडेल याचा हिशेब सांगणारा एक अहवालच दिल्लीत सादर करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी गरज पडल्यास आपली सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करण्याचीही तयारी असल्याचे जाहीर केले. परिणामी पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी आपल्या जागा खुपच कमी असल्याचे पवारांना जाहीर मान्य करावे लागले. नव्हे काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याकडून ते वदवूनच घेतले. पवारांचे ओळख एक धुर्त राजकारणी अशीच आहे. त्यामुळे ते कधी काय भूमिका घेतील, याबाबत नेमके भाकित करणे कठीणच आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनाही याची पुरती जाणीव आहे. त्यामुळे जागावाटपाचा घोळ निस्तरण्याआधिच पवार निवडणुकीनंतरही काँग्रेससोबतच राहतील, ते वेगळी चुल मांडणार नाहीत, याची खाञी करणे काँग्रेसला आवश्यक वाटले असावे. काही जणांचा विरोध असला तरीही आघाडी हवीच! असे मत असलेला मोठा मतप्रवार दोन्ही काँग्रेसमध्ये होता. एकंदरीतच राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात चांगला जोर असला आणि काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष असला, तरीही येथे दोघांचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रविवारी अगदी ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर एकमत झाले. सोमवारीच दोन्ही पक्षांनी आपल्या काही उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आणि खऱ्या अर्थाने निवडणुक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकंदरीतच दोन्ही काँग्रेसची अवस्था "तूजवाचून जमेना....." अशी झाली आहे. शिवसेनेनेही आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख यावेळी प्रचाराच्या रिंगणात उतरणार नसले तरीही उध्दव ठाकरे यावेळी जोरदार कामाला लागले आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर सभांचा सपाटा लावला आहे. भारतीय जनता पक्षही भर मंदीत आयटी व्हिजन डोळयासमोर ठेउन मते मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.
Monday, March 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
राहुलजी
ReplyDeleteलेख वाचले
छानच
सध्या लिहिते पत्रकार कमी कमी कमी होत चाललेले असताना तुम्ही लिखाणाचा घाट घातला, हे सुंदर